शेक्सपियर... जगातल्या सर्वात महत्त्वाच्या नाटककारांपैकी एक !
सोळाव्या शतकात त्याने लिहिलेल्या नाटकांनी त्यावेळच्या युरोपियन प्रेक्षकांना तर भुरळ घातलीच पण त्यानंतरही आज पर्यंत त्याच्या कलाकृती, जगातील, हरेक देशातील अनेक कलाकारांना मोहवून टाकत आहेत.
मानवी नात्यांची गुंतागुंत, त्यामधील अनेक पदर, अत्यंत खुबीने मांडणारी त्याची नाटके ही सृजनशील कलाकारांसाठी नेहमीच आव्हान देणारी ठरली आहेत.
किंग लियर, मॅकबेथ, रोमिओ-ज्युलिएट, ऑथेल्लो अशा त्याच्या अनेक अजरामर कलाकृती. यातलीच एक महत्त्वाची कलाकृती म्हणजे हॅम्लेट. हॅम्लेट ही खरं तर कुठल्याही कसलेल्या अभिनेत्याची परीक्षा पाहणारे नाटक... सुमित राघवन सारख्या सेन्सिबल नटाला हे नाटक करावसं वाटलं नसेल तर नवलच.
आपल्या वडिलांचा खून आपल्या काकानेच केला आहे हे कळल्यावर सूडाने पेटून उठलेल्या पण त्याच बरोबर या खुनाच्या कटात आपली आई ही सहभागी आहे हे समजल्यावर आपल्या जीवाची अत्यंत वेदनादायी घालमेल होणाऱ्या राजपुत्राची ही कथा.
हॅम्लेट या पात्राच्या या द्विधा मनस्थितीच सार हे त्याच्या टू बी ऑर नॉट टू बी या जगप्रसिद्ध संवादांमध्ये सामावलं आहे.
सुमित राघवन हि घालमेल ही द्विधा मनस्थिती अत्यंत बारकाईने आपल्यासमोर उभी करतो.
सुमित राघवन ला तुषार दळवी, भूषण प्रधान, मनवा नाईक यांनीही चांगली साथ दिलेली आहे. तुषार दळवी यांनी रंगवलेला खलनायकी काका व मनवा नाईक हिने रंगवलेली ऑफेलिया हे विशेष लक्षात राहतात.
शेक्सपिअरच्या नाटकाचे रूपांतर मराठीत करणे तसे सोपे नाही पण नाना जोग यांनी केलेले हे हॅम्लेट चे भाषांतर अत्यंत प्रवाही वाटते.
या सगळ्या शिवाय आहे विशेष कौतुक करायला हवं ते राहुल रानडे यांच्या संगीताच, नेपथ्याच आणि वेशभूषेच. नेपथ्यातून उभा केलेला किल्ला व नाटकातील ऐतिहासिक युरोपियन पोशाख हे विशेष लक्ष वेधून घेतात.
शेक्सपिअरची नाटके रंगमंचावर आणणे हे खरंतर मोठं आव्हान. मराठी रंगभूमीवर शेक्सपिअरच हॅम्लेट उभं करण्यासाठी, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी व सर्व कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीसाठी व या निमित्ताने एक सुंदर कलाकृती मराठी प्रेक्षकांसमोर आणण्यासाठी सगळ्यांचे आभार.
(परिक्षण: असीम त्रिभुवन - फक्त मिलेनिअल मराठीसाठी!)
परिक्षणाचा विडिओ बघण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा …

