ती.....
रेल्वे प्लॅटफॉर्म वर एकटीच बाकावर बसुन रेल्वेची वाट पाहत चेहऱ्यावर येणाऱ्या त्या जुल्मी केसांना मागे सारत मला पाहुन तिने तिचे चाफेकळी नाक मुरडत, पहाटेच्या दवबिंदू परी ओठांना सळया सारख्या दातांत दाबुन जेंव्हा तीने आग ओखणाऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे तुच्छतेने पाहीले, तेंव्हा मला माझीच दया आली.
थोड पुढे गेल्यानंतर मी माझ्या नशिबा सारख्याअर्धवट फाटत आलेल्या खिशातून माझ्या सारखाच आयुष्याला तडा गेलेला माझा भ्रमणध्वनी बाहेर काढला. स्वतः ला त्यात पाहुन मनाच्या कोपऱ्यात एक विचार उभा राहिला. का तीने तसे करु नये, आपल्या सारख्या नशिबाने लाथाडलेल्या व दैवाने उरलेल्या चिखलाने कंटाळून बनवलेल्या चेहऱ्याने तिच्या सारख्या रूपाच्या खानीला एक नजर तरी पाहायची लायकी आहे का?
या विचारात गुंग असताना कोणीतरी सप्तसूरी गळ्यातून आवाज दिला, मी नकळत मागे वळून पाहिले तेंव्हा मला माझ्याच डोळ्यांवर विश्वास नव्हता, तरी ह्रदयाच्या वाढत्या गतिला मनाचा ब्रेक लावुन भावनेची गाडी आशेच्या रस्त्याच्या कडेला थांबवून मी तीला विचारले "हं बोला ना". त्यावर तिने तिच्या इंद्रधनू परी भुवयांवर तिंतेची अठी आणुन सप्तस्वरांच्या अगदी शेवटच्या स्वराने विचारले "भैय्या पुणे गाडी याच प्लॅटफॉर्म वर लागेल का?" तेंव्हा भावनेच्या त्या गाडीला पाठीमागून एका मोठ्या ट्रक ने ठोकर मारल्या सारखी मनाची अवस्था झाली. शब्द स्वरनलीकेत येउन अडकले. मी फक्त माझ्या मानेने होकार देउन भावनेचा घडलेला अपघात सहन करुन माझ्या गाडीची वाट पाहण्यासाठी सुरक्षित अंतर ठेवून उभा राहिलो........
लेखक - अजय राजेंद्र कांबळे

